मुंबई- देशभरात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवले असताना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई सह राज्यभरात कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. अशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी प्रशासनाकडून बंद करण्यात आलेले आहेत. टाळेबंदीचा दुसरा टप्पा पुन्हा लागू करण्यात आल्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात उत्तरकार्य, सत्यनारायण, लग्न, मुंज यांसारखे विधी करून आपले पोट भरणाऱ्या हजारो पुरोहितांवर सध्या उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे.
मंदिर बंद अन् धार्मिक विधी बंद
संजय व्यवहारे गुरुजी हे गेली अनेक वर्षे पुरोहिताचे काम करून आपले व आपल्या कुटुंबियांचे पोट भरत आहेत. कोरोना संक्रमणामुळे पहिल्यांदा टाळेबंदी लावण्यात आल्यानंतर त्यांच्या आर्थिक मिळकतीवर याचा मोठा परिणाम झाला होता. मात्र, त्यानंतर टाळेबंदीत सूट देण्यात आल्यामुळे त्यांची आर्थिक घडी सुरळीत चालत असताना आता पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे मंदिर व मोठी धार्मिक कार्य बंद करण्यात आल्याने याचा फटका त्यांना बसला आहे. यामुळे सध्या आर्थिक समस्यांना हजारो पुरोहितांना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी म्हटलेल आहे. राज्य सरकारकडून कडक निर्बंध घोषित करत असताना समाजातील वेगवेगळ्या घटकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा, उत्तरकार्य किंवा इतर धार्मिक विधी करून आपले व आपल्या कुटुंबीयांचं पोट भरणाऱ्या पुरोहितांना सध्याच्या काळामध्ये घर कसे चालवायचे हा प्रश्न सतावत असल्याचे संजय व्यवहारे गुरुजी यांनी म्हटलेले आहे.