मुंबई -संपूर्ण विश्वात 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीला समृद्ध करण्यासाठी अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांचे मोठे योगदान आहे. आज दुर्दैवाने अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी आणि हिंदी शाळेत टाकतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे संरक्षण आणि संवर्धन करायचे असेल, तर सर्वांनी मिळून मातृभाषेत शिक्षण घेणे फार गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिली.
मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर-
भाषा संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पातळीवर मातृभाषा दिन साजरा केला जातो. राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी शाळांचे व शिक्षकांचे मोठे योगदान आहे. परंतु, आज महाराष्ट्रात याच मराठी शाळांतील शिक्षाकांना अनुदानासाठी झगडावे लागते आहे. फडणवीस सरकारने घोषित केलेले अनुदान महाविकास आघाडीने रोखून धरले आहे, ही मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक सेल महाराष्ट्र प्रदेशाचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.