मुंबई : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने बेरोजगारीबाबत काही आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3% पर्यंत वाढला, जो गेल्या 16 महिन्यांतील सर्वोच्च आहे. एका बाजूला सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण तर दुसऱ्या बाजूला ही वाढती बेरोजगारी अशा संकटात सध्या देशातला तरुण वर्ग अडकला आहे. हम करे तो करे क्या? असे मोठे प्रश्नचिन्ह या तरुण वर्गासमोर आहे. त्यामुळे अनेक जण करिअरच्या नव्या संधी नव्या वाटा शोधत असतात. अशीच एक तुमचे करिअर घडवण्याची संधी आहे ती फिटनेस क्षेत्रात. तुम्हाला देखील फिटनेस ट्रेनर व्हायचे असेल तर हा रिपोर्ट नक्की वाचा.
कोविडनंतर फिटनेसवर लोकांचे लक्ष : एखाद्याला फिटनेस ट्रेनर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला हवं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर प्रीती सावंत यांच्याशी संपर्क साधला. ईटीव्हीशी बोलताना प्रीती सावंत यांनी सांगितलं की, "आपण मागची दोन वर्ष कोरोनामुळे घरीच अडकलो होतो. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली, त्यामुळे आता फिटनेस ट्रेनर्सची लोकांना गरज वाटू लागली आहे. मी मागची बारा वर्ष या क्षेत्रात काम करते आणि जवळपास हजारहून अधिक लोकांना मी आतापर्यंत ट्रेनिंग दिले आहे. यात काही सेलिब्रिटींच्या देखील समावेश आहे."
कशा वळल्या प्रीती सावंत क्षेत्राकडे? :आजपर्यंत हजारो लोकांना ट्रेन करणाऱ्या प्रीती सावंत या क्षेत्राकडे कशा वळल्या? ( How Preeti Sawant turned fitness trainer ) हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, "सुरुवातीला मी एका व्यक्तीकडे घरकाम करायचे. काही कारणास्तव त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. त्यावेळी मला फक्त पाचशे रुपये पगार होता. अचानक कामावरून काढून टाकल्याने दुसऱ्याच्या घरी जाऊन एक घरकाम करणारी स्त्री दुसरं काय काम करू शकते असा विचार मी स्वतःबद्दल करत होते. मात्र, माझ्या भावाने जिम ट्रेनर होण्याचा सल्ला दिला आणि मी त्याच्या तयारीला लागले. जिम ट्रेनर झाल्यावर मला पाच हजार रुपये सुरुवातीचे मानधन होतं. नंतर मी काही कोर्स केले आणि आता मी माझे घर व्यवस्थित चालू शकते इतकं मानधन घेते."