मुंबई- अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अटक होत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याच्या संदर्भात त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयामध्ये अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन अर्ज अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीने मागे घेतला आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या स्टूडिओसाठी इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी काम करून दिले होते. यासंदर्भात काही पैशांची थकबाकी असताना पैसे न मिळाल्यामुळे 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबागमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गोस्वामी यांचे नाव आढळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई रायगड पोलिसांनी केली होती.