मुंबई- बोरीवली येथील भगवती रुग्णालयातील गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला अतिदक्षता विभाग येत्या सोमवारपासून तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. येथे तातडीने बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच रुग्णालयात सध्या तुटवडा असलेली इंजेक्शन सुद्धा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहितीही दरकेर यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्याची मागणी दरेकर यांनी आयुक्त इकबाल चहल यांच्यासोबत दूरध्वनीवरुन संपर्क साधल्यानंतर सोमवारपासून रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येईल, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले, असे दरेकर यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सकाळी बोरीवली येथील भगवती महानगरपालिका रुग्णालयाला भेट दिली. यावेळी दरेकर यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा, उपलब्ध औषधे व इंजेक्शन आदी आरोग्य यंत्रणांची माहिती घेऊन येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक आमदार मनिषाताई चौधरी, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक जितेंद्र पटेल, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, भाजपचे दहिसर मंडल अध्यक्ष अरविंद यादव, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, भगवती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. वाडे, सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्यासह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईमध्ये खास करून उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. यासाठी सरकारी रुग्णालय आणि महापालिका रुग्णालयांमधील अपुरी व्यवस्था हे मुख्य कारण आहे. जर सरकारी रुग्णालय आणि महापालिका रुग्णालये अद्यावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज ठेवली, तर खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण जाणार नाहीत. पण बोरीवलीत मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून लूट होताना दिसत आहे. भगवती रुग्णालयात दोन वर्षांपासून सर्व साहित्य आणि यंत्र खरेदी करूनही येथील अतिदक्षता विभाग सुरू झाले नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला. भगवती रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
एका बाजूला जनतेचा पैसा दोन वर्ष त्या मशीनवर खर्च केला. त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. गेले दोन वर्ष यंत्रणा उपलब्ध असताना सुद्धा हा विभाग सुरू करण्यात आला नाही. हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. या सर्व गोष्टी आजच्या भेटी दरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या व तातडीने आयुक्तांशी संर्पक साधला. स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी ६ जूनला संबंधित विषयावर लक्ष वेधण्यासाठी पत्र दिले होते. त्यालाही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. एखादा आमदार जेव्हा 10 ते 15 दिवसाआधी या गंभीर विषयावर लक्ष वेधतो. त्याची साधी दखलही घेता येत नसेल तर हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे रुग्णालयात जो विस्कळीतपणा आणि हेळसांडपणा झाला आहे, तो अशाच बेजबाबदार व्यवस्थेमुळे झाल्याची टीका दरेकर यांनी केली.