मुंबई Pravin Darekar On Manoj Jarange Patil :जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवारी) भव्य सभा झाली. या सभेला मराठा समाजातील लाखो नागरिक उपस्थित होते. सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक नसल्याची टीका जरांगे पाटील यांनी यावेळी केली. याविषयी प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण?अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील लाखो लोक जमल्यानंतर जरांगे पाटील यांनी केलेली वक्तव्यं अत्यंत धक्कादायक आहेत. राज्य सरकार हे नेहमीच मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असे असताना जरांगे पाटील यांनी सरकार आणि शिंदे फडणवीस यांच्यावर केलेली टीका ही वेगळा राजकीय वास निर्माण करणारी आहे. जरांगे पाटील यांच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवली आहे किंवा त्यांनी आपला खांदा कोणाला बंदुकीसाठी वापरायला दिला आहे हे पाहणे आवश्यक आहे. ते जे बोलत आहेत त्याच्यामागे नक्कीच कोणीतरी आहे. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण हे स्पष्ट करावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.