मुंबई - साकीनाका येथे झालेली बलात्काराची घटना शरम आणि संताप आणणारी आहे. या घटनेमुळे मुंबई शहर असुरक्षित आहे, हे सिद्ध झाले आहे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व दोषींवर कारवाईसाठी दिशा व शक्ती कायद्याची घोषणा राज्य सरकारने केली. हे कायदे कुठे गेले असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया रुग्णालयाला भेट
साकीनाका येथे मध्यरात्री एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी करण्यात आले. या महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ तासाहून अधिक तास ती मृत्यूशी झुंज देत होती. आज सकाळी बारा वाजताच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते.
'दिशा कायदा, शक्ती कायदा कुठे आहेत'
यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिलेचा बलात्कार होऊन गुप्तांगात रॉड टाकणे ही शरम आणि संताप आणणारी घटना आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी आता तरी जागे व्हावे असे आवाहन दरेकर यांनी केले. राज्य सरकारने महिला आयोगाला अजून अध्यक्ष दिलेला नाही. महिलांना न्याय देण्यासाठीचा दिशा कायदा, शक्ती कायदा कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी उद्रेक झाला. तर त्याला सरकार जबाबदार असेल असे दरेकर म्हणाले. विकृत मानसिकता कशी होते त्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे असेही दरेकर म्हणाले.
'कृती आराखडा तयार करावा'
राज्यात महिला अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. शक्ती कायदा आणण्याच्या बाबतीत सरकारने अक्षम्य दिरंगाई दाखवली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, महिला अत्याचार रोखले जावेत, अत्याचाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकार नेमके काय करणार आहे, याबाबतचा एक कृती आराखडा सरकारने येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावा, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पत्राद्वारे सरकारकडे केली.
हेही वाचा -Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश