मुंबई - कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला. अशाच धक्कादायक घटना गेल्या काही महिन्यांपासून राज्यात घडत आहेत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. त्या रोखण्यासाठी सरकारने लवकरात उपाययोजना कराव्यात अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना रोखा, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल - प्रवीण दरेकर - Pravin Darekar on Badnera girl issue
बडनेरा येथे मुलीच्या गुप्तांगामधून स्वॅब काढण्याचा प्रकार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुलींच्या आणि महिलांच्याबाबतीत अशा घृणास्पद घटना घडल्या आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे लक्षच नसल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

बडनेरा येथे मुलीच्या गुप्तांगामधून स्वॅब काढण्याचा प्रकार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. चाकणला एका सतरा वर्षाच्या मुलीची हत्या झाली. रोहा येथे एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या झाली. पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला. पुणे, जालना, बीड येथेही काही घटना घडल्या आहेत. मात्र, याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. सरकारला सांगणे आहे, आता तरी जागा व्हा. राज्यात रोज ज्या मानवतेला काळिमा लावणाऱ्या घटना घडत आहेत त्या थांबवाव्या लागतील. अन्यथा जनतेचा राज्यात उद्रेक होईल आणि सरकारला ते आवरणे कठीण होईल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.