मुंबई- शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व दलालांचे उच्चाटन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची घोषणा सरकारने केली होती. मात्र, ही योजना देखील सरकारला राबवता आली नाही, अशी खरमखरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आघाडी सरकारवर केली. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.
हेही वाचा -राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी; कोरोनाचा धोका
उलट गौरव करायला हवा होता
महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही वैयक्तिक टीका केली जाते. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेत्यांना शरीरयष्टीवरून चिडवले जाते. ही सभागृहाची संस्कृती नाही. सत्ताधाऱ्यांनी या संविधानिक पदाची गरीमा घालवली. परंतु, एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना आपण जनतेसाठी काय दिवे लावले, याचाही विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा, अशा शब्दांत दरेकर यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. तसेच, राज्यपालांनी अस्खलित मराठी भाषेतून भाषण केल्याने त्यांचा गौरव करायला हवा होता, असे सांगत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले.
जगाला दिशा देण्याचे काम मोदींचे
कोरोनामुळे महाराष्ट्रात ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला. सरकार याबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी केंद्राकडे बोट दाखवत आहे. ज्या डब्ल्यूएचओने धारावीचे अभिनंदन केले, त्या डब्ल्यूएचओला आणि जगाला दिशा देण्याचे काम मोदींनी केल्याची दरेकर यांनी पुष्टी जोडली. कोरोना काळात केंद्र सरकारने कोरोनासाठी सर्वच राज्यांना मदत केली. महाराष्ट्रालाही केली, मात्र त्याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात केला नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.