मुंबई -मुंबईतशनिवारी (17 जुलै) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या आहेत. विक्रोळी सुर्यनगर येथे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकावरती उपचार सुरू आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे पावसाचे नव्हे, तर महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते विक्रोळीतील सूर्या नगर येथील घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
'पालिकेने जबाबदारी स्वीकारावी'
'हे पूर्णपणे महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत. मुंबईत पाऊस दरवर्षी पडतो. दरवर्षी मुंबईही तुंबते. अशावेळी तुंबणारी ठिकाणे कोणती व कोणत्या भागात दरडी आहेत, याचा डाटा पालिकेकडे असतो. केवळ नोटीस चिटकवली म्हणजे जबाबदारी संपली का? जर त्यांनी त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न सोडवला असता तर ते स्थलांतर झाले असते. आता नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर आम्ही नोटिसा दिल्या होत्या म्हणजे यांची जबाबदारी संपली का. पावसावर जबाबदारी ढकलली, असे होत नाही. तुम्हाला जबाबदारीपासून पळता येणार नाही. या सर्व झालेल्या घटनेला महानगरपालिका जबाबदार आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी. पाच-दहा लाख रुपये देऊन लोकांचे जीव तर परत येणार नाहीत ना. यामुळे संभाव्य दुर्घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे', असे दरेकरांनी म्हटले आहे.
एकूण 30 जणांचा मृत्यू
मुंबईत 11 ठिकाणी घरे आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात वाशी नका येथे 24 जणांना बाहेर काढले. त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जखमी झाले आहेत. विक्रोळीतील सुर्या नगर येथे 11 जणांना बाहेर काढले आहे. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जण जखमी झाला आहे. अशा एकूण 30 जणांचा मृत्यू झाला आहे.