मुंबई - काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक प्रवीण छेडा यांनी घरवापसी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्तिथीत भाजपमध्ये प्रवेश केला. रामाचा वनवास 14 वर्षाचा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी माझा वनवास कमी केला असून, पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य छेडा यांनी केले.
प्रवीण छेडांची घरवापसी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश - CM
काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक प्रवीण छेडा यांनी घरवापसी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्तिथीत भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपचे जेष्ठ नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत मतभेद असल्याने प्रवीण छेडा यांनी 2007 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ३ वेळा नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष आणि काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवले आहे. मेहता यांच्यासोबत छेडा यांचे टोकाचे मतभेद होते. मात्र, आज एकमेकांच्या मांडीला मांडी लावून दोन्ही नेते बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ईशान्य मुंबईमधून किरीट सोमैय्या यांच्या जागी छेडा यांना संधी मिळणार काय? अशी विचारणा केली असता, पक्ष देईल ती जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य मुंबईमधून किरीट सोमैय्या यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा असून त्यांच्या जागी प्रकाश मेहता किंवा छेडा यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते.