मुंबई - बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट) समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे, भाजपाकडून प्रकाश गंगाधरे तर काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अर्ज भरला होता. रवी राजा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रवीण शिंदे व प्रकाश गंगाधरे यांच्यात थेट लढत झाली. यात सेनेच्या प्रवीण शिंदे यांनी बाजी मारली असून ते बेस्ट समितीचे नवीन अध्यक्ष झाले आहेत.
बेस्ट समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रवीण शिंदेंची निवड - बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे न्यूज
बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे प्रवीण शिंदे आणि भाजपाच्या प्रकाश गंगाधरे यांच्यात थेट लढत झाली. यात प्रवीण शिंदे यांनी बाजी मारत भाजपाचा पराभव केला.
शिवसेना ८, भाजपा ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी १ अशा एकूण १७ सदस्यांपैकी शिवसेनेच्या प्रवीण शिंदे यांना ८ व भाजपाच्या प्रकाश गंगाधरे यांना ५ मते मिळाली. २ मते अवैध ठरली. काँग्रेस तटस्थ राहिल्याने बेस्ट समिती अध्यक्षपदावर प्रवीण शिंदे यांची निवड झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केला. बेस्टचे शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी 50 ते 60 कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून आर्थिक मदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर बेस्टमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. प्रवाशांना सध्या रेल्वेतून प्रवास करता येत नाही. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या 30 लाखांवर गेली आहे. यामुळे बेस्ट सध्या मुंबईकरांची पहिली लाइफलाइन झाली आहे, असे शिंदे म्हणाले.