मुंबई -मनी लॉड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. ( Praveen Raut Money Laundering Case ) आज प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ( Praveen Raut in Judicial Custody ) सुनावण्यात आली.
ईडीने न्यायालयासमोर सांगितले की प्रवीण राऊत यांनी अनेक राजकीय नेत्यांना पैसे दिले आहे, अशी बाब तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आणखी कोठडीची आवश्यकता आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने प्रवीण राऊत यांना आज न्यायालयीन कोठडीत पाठवले.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त -
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.