मुंबई - आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्याच्या जनतेशी संवाद साधताना लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल आहे, असे व्यक्तव्य केले होते. यावरूनच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. आरोग्यमंत्र्यांनी यापुढे केंद्र सरकार महाराष्ट्राला लस देत नाही, असा आरोप करू नये, अशी विनंती केली आहे. तसेच लसीकरणाची मोहीम राज्यामध्ये योग्य पद्धतीने राबवावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार ताबडतोब द्यावे -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर डॉकटर, नर्स यांची रिक्तपदे भरण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार प्रशासकीय गोंधळामुळे देता आले नाही, ते सरकारने ताबडतोब द्यावे. सर्वात जास्त लसीकरण आपल्या राज्यात होत आहे, हे आपण सांगतो त्यामुळे लसीकरण केंद्रावर कोणताच गोधळ निर्माण होणार नाही, याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.