महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी वाहक भगवान गावडे यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत द्या - प्रवीण दरेकर

मुंबईत बेस्टच्या मदतीला गेलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगाराचे एसटी वाहक भगवान गावडे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. भगवान गावडे यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत तसेच एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Bhagwaan gawde
भगवान गावडे

By

Published : Nov 2, 2020, 6:00 PM IST

मुंबई -अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मंगळवेढा आगारातील एस.टी. वाहकाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिवंगत एसटी वाहक भगवान गावडे यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत तसेच एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.


शहरातूनच मुंबईत बेस्टच्या मदतीला गेलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगाराचे एसटी वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे उपचार मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला होता. पण त्यांनी काही लक्ष दिले नाही.

पत्नीच्या विनंतीकडेही दुर्लक्ष

वाहक भगवान गावडे हे आजारी असून त्यांना कामावर पाठवू नये, अशी विनंती त्यांच्या पत्नीने आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली होती. अशा परिस्थितीत त्याला कामावर पाठवण्यात आले. कामावर गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे, असे उघडकीस आले आहे.

इतर कर्मचाऱ्यांचीही आबाळ

निकृष्ट दर्जाचा आहार, काम संपल्यानंतर 4-4 तास होणारी धावपळ आणि मुंबईतील वातावरण हे एसटी कर्मचाऱ्यांना सुट न होणे यामुळे गावडे यांच्यासारखे अनेक कर्मचारी आणखी अडचणीत सापडले आहेत. गावडे यांची संकटात दखल न घेतल्याने त्यांना उपचाराविनाच जीव गमवावा लागला आहे.


कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्या
एसटी वाहक भगवान गावडे यांचा मृत्यू अत्यंत दुर्देवी आहे. त्यांनी सोलापूरपासून मुंबईपर्यंत चांगल्या उपचाराची मागणी केली असताना देखील विभागाचे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळेच गावडे यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणामुळे एकंदर एसटी वाहकांची होत असलेली दुरवस्था, त्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड या ठिकाणी दिसत आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सर्व कर्मचारी काम करतात आणि ज्यापद्धतीने त्यांची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, ती व्यवस्था एसटी प्रशासनाकडून दुर्देवाने होत नाही! त्याबाबत काळजी घेण्याची विनंती सरकारला करतो. तसेच भगवान गावडे यांच्या कुटुंबीयांना सुद्धा मदत व्हावी आणि त्यांच्या परिवारातील व्यक्तीला एसटी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details