मुंबई -राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही इतर समाजाच्या नेत्यांनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
मराठा समाजातील अनेक नेत्यांकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी लावून धरली जात आहे. त्या विरोधात राज्यातील ओबीसींमधून संताप व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये, याच मागणीसाठी आज 'ओबीसी आरक्षण बचाव' या नावाने महाराष्ट्र राज्य समता परिषदेकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यासोबतच राज्यभरातील विविध ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाने कोणतीही मागणी करू नये, अशी मागणी करण्यात आली.