मुंबई- लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना स्वराज्यासाठी कारणीभूत ठरलेल्या 'वंचित'ने येत्या विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळेच आगामी मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीचाच असेल, अशी दर्पोक्ती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. बुधवारी ते दादर येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर
राज्यात पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर अॅड. आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खरे तर देवेंद्र फडणवीस स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना तसे म्हणता येत नाही. पुढचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर पुढचा मुख्यमंत्रीच वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे.
३१ आॅगस्ट ही काँग्रेसला नव्हे तर स्वत:ला अंतिम मुदत घातली होती, असे सांगत अजूनही काँग्रेससाठी आपले दरवाजे मोकळे आहेत, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. मात्र, विधानसभेच्या १४४ पेक्षा अधिक जागा काँग्रेसला देणार नाही. याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच आमच्या संभाव्य आघाडीत राष्ट्रवादी पक्ष असणार नाही. कारण राष्ट्रवादीची मते काँग्रेसला मिळत नाहीत, असे काँग्रेसवाले म्हणतात. मग आम्हाला तर ती कशी मिळतील,असे सांगत राष्ट्रवादीबरोबर वंचित आघाडी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे उमेदवार, एकूण जागा तसेच आघाडीतील मित्र पक्ष यासंदर्भात निश्चितीचे काम चालू आहे. चार-पाच दिवसात सर्व काही स्पष्ट होईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. एमआयएम आपल्या आघाडीत असेल. त्यासंदर्भात आपण राज्यातल्या एमआयएमच्या कोणत्याही नेत्यांच्या मागणीला भीक घालत नाही. मी असदुद्दीन ओवेसी यांच्या संपर्कात आहे. आघाडीचे जे बोलणे होईल ते थेट त्यांच्याशीच होईल, असे सांगत अॅड. आंबेडकर यांनी औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच वंचितची राज्यात सत्ता आल्यास आशा स्वयंसेविकांना प्रतिमाह ३००० रुपये तर अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपये प्रतिमाह वेतन देऊ, तसेच उज्वला गॅस योजनेत वर्षाकाठी सात सिलेंडरसाठी १०० रुपये अनुदान देण्यात येईल, असे अॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्यात वंचित आघाडी ११ ते १८ सप्टेंबर दरम्यान महारॅली काढणार असून त्याचा प्रारंभ नागपुरात तर समारोप कोल्हापुरात होणार आहे. रॅलीचा प्रवास हा वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातून होणार असल्याची माहिती, आज आंबेडकरांनी दिली.