मुंबई - भारतात बाहेरचे मुस्लीम आहेत, किती आहेत हा आकडा त्यांनी दिली पाहिजे. ढोल वाजवणारे रस्त्यावर चिक्कार असतात. बेछूट आरोप करणाऱ्यांकडे आकडा आहे का? हे विचारा अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
सीएए आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे निघाले, आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील उडी घेतली आहे. या कायद्याच्या समर्थनात येत्या ९ फेब्रुवारीला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुस्लिमांना परत पाठवा, या मागणीसाठी हा मोर्चा असणार असल्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर बोलत होते.
पाकिस्तान आणि बांगलादेशवरून किती मुस्लीम भारतात आले आहेत, हा आकडा त्यांनी सांगितला पाहिजे. ते १० आहेत की करोड आहेत हे समोर आले पाहिजे. कोणीतरी काहीतरी बोलतोय, यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यात काही सत्यता आहे का, हे बघणे आवश्यक आहे. गेली ७० वर्ष भारताची सुरक्षा करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहेत. यामध्ये गुप्तचर यंत्रणासह अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. असे विधान करून या यंत्रणेचे खच्चीकरण काम करण्याचे काम करू नये. कारण, अशा विधानामुळे या यंत्रणा काम करत नाही असा संदेश जातो. त्यामुळे आरोप करताना एकूण किती आकडा आहे हे समोर आले पाहिजे. बेछूट आरोप करू नये, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.