मुंबई OBC vs Maratha Reservation : संविधानाच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी संविधान सन्मान सभेचं दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजन (Chhagan Bhujbal Hingoli Sabha) केलं होतं. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. या सभेत नाना पटोले यांनी 'वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेससोबत यावं' असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केलं. तर, आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना इशारा देत आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांना 'भुजबळ तुम्ही माझ्या नादाला लागू नका. जेव्हा मंडल कमांडल असा वाद सुरू होता, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? हे सर्वांना माहिती आहे" असं म्हणत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तर, 'मराठा समाजानं देखील संयमानं वागावं' असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केलं आहे.
आरक्षण नेमकं कशासाठी हे समजून घ्या :वंचित बहुजन आघाडीनं आयोजित केलेल्या संविधान सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते दादरच्या शिवाजी पार्क इथं आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावरून भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आरक्षण नेमकं का आहे? आणि कशासाठी आहे? हे अजून देखील आपल्या समाजाला आणि नेत्यांना समजलेलं नाही. आरक्षणाचा इतिहास आधी आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी आरक्षण का दिलं? हे सर्वांनी समजून घ्या. या सभेचा मुख्य उद्देश म्हणजे, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे संविधान" असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
अखंड भारत म्हणजे काय ? : पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "सध्या संविधान बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. मागे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताबाबत वक्तव्य केलं होतं. हा अखंड भारत पार अफगाणिस्तानपर्यंत जातो. त्यामुळं जेव्हा तुम्ही अखंड भारत आणि संविधान बदलण्याची भाषा वापरता, तेव्हा हे कोणताच नेता स्पष्ट करत नाही की, अखंड भारत म्हणजे काय? त्यात कोणते देश असतील आणि संविधान बदलणार म्हणजे नेमकं काय करणार? तुम्ही अध्यक्षीय लोकशाही आणणार आहात? सध्या आपल्याकडं संसदीय लोकशाही आहे. की तेच कायम ठेवणार आहात ? कायद्यांमध्ये कोणते बदल करणार आहात का? याबाबत कोणताही नेता बोलत नाही" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.