मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसने भाजपची 'बी टीम' म्हणून आमच्यावर अपमानास्पद टीका केली. त्या टीकेचा त्यांनी खुलासा करावा. तरच आम्ही विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सामील व्हायचे की नाही त्यावर बोलू, अशी आडमुठी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आम्हाला येण्यासाठी काँग्रेसकडून पहिले पत्र आले. ते व्यक्तिगत असले तरी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, आम्हाला बी टीम म्हणून हिणवले. त्याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही. आम्ही आघाडीत जाणार नाही, असे नाही. परंतु काँग्रेसने खुलासा केल्यास आम्ही पुढे चर्चा करू, असे आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज आपल्यावर कारवाई होईल म्हणून भाजपमध्ये जात आहेत. लोकसभेत आम्हाला ४० लाख मते मिळाली. त्यामुळे ज्या जागा आहेत, त्यावर नवीन चेहरे देण्याचे आमचे धोरण आहे. आमच्या संपर्कात राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे लोक आहेत. मात्र, आमचे अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलत नाही. आमचा उद्देश कोणत्याही पक्षाला कमी लेखण्याचा नाही. आम्ही पहिली उमेदवार यादीही या महिन्याच्या शेवटी जाहीर करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.