मुंबई- आपल्या देशाला दोन पंतप्रधानांची गरज आहे. नरेंद्र मोदी हे देशात कमी आणि परदेशात अधिक असल्याने ते आंतरराष्ट्रीय पंतप्रधान असल्याची टीका वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भाजपने राफेल विमानांच्या खाली ठेवलेल्या लिंबूचा प्रकार तर चिंता करण्यासारखा आहे. भाजपने केवळ आपला टीआरपी वाढवण्यासाठी फ्रांस सोबत 'डिल' केली आहे, असा टोलाही आंबेडकरांनी लगावला.
वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा -
चुनाभट्टीतील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित केला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू, केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देऊ,घनकचऱ्यावर वीज निर्मिती, वीजदर कमी करू, मुंबईतील मूळ भूमीपूत्रांच्या नावावर जमिनी करू, अशी आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, की आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा डिजिटल केला आहे. जाहीरनाम्यातील काही मुद्दे पहिल्यांदाच प्रसिद्ध केले आहेत. काही पक्षांनी हे मुद्दे चोरले आहेत. दुष्काळ संपवू, हा मुद्दा आम्ही जाहीरनाम्यात मांडला होता. तो मुद्दा आता सर्वांच्या जाहिरनाम्यात दिसत आहे.
हेही वाचा - विक्रोळी विधानसभेतील मनसेचा 'वामनमूर्ती' स्टार प्रचारक
भाजपने नदीजोड प्रकल्प राबवणार, असा मुद्दा जाहिरनाम्यात टाकला आहे. मात्र, याचा आराखडा त्यांच्याकडे नाही. भाजप, काँग्रेसने पाट्या टाकण्याशिवाय काही केले नाही. मात्र, आम्ही 5 वर्षे काय करणार याचा अजेंडा दिला आहे. भाजपने दुष्काळी भागात पाणी का वळवले नाही. आम्ही जाहीर केल्यानंतर त्यांना आठवण झाली का? राष्ट्रवादीनेही केजी टू पीजी हा आमचा मुद्दा कॉपी पेस्ट केला आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला.
भाजप सरकारने 2014 ला कारखाने येतील, असे जाहीर केले. पण, त्यांनी लोकांना फसवले. जाहीरनाम्यातही 1 कोटी नोकऱ्या देऊ, असे सांगण्यात आले आहे. मात्र, मागील 5 वर्षांचा इतिहास बघा 2 लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. हे सरकार सामान्य माणसाचे सरकार नाही. येथील बँका डबघाईला आल्या आहेत. बँका वाचण्यासाठी हा लगाम आपल्या हाती घेतला पाहिजे. भारतातून इतर देशात 33 हजार कुटूंब का स्थलांतर झाले? हे या सरकारने सांगावे, असे आव्हान आंबेडकरांनी दिले.
हेही वाचा -भाजपच्या जाहिरनाम्यावर सचिन सावंत यांची टीका, भाजपचे 'संकल्पपत्र' नसून 'अपयशपत्र'
ट्रिपल तलाकवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योग्य ती भूमिका घेतली नाही. सेना-भाजपला सत्तेपासून लांब ठेवेले, तर मुस्लिमांवर होणारे अत्याचार आणि मॉब लिचिंग थांबेल. मुस्लिमांनी जर आम्हाला साथ दिली, तर मुंबईत 13 ठिकाणी आम्ही जिंकू शकतो, असा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केला.