मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून स्थापना झाल्यानंतर मुंबईचे मोठे योगदान होते. आमची राज्यात अनेक वर्षे सत्ता होती. यादरम्यान आम्ही जसे ग्रामीण भागातील प्रश्नांकडे लक्ष दिले, त्याप्रमाणे मुंबईकडे देता आले नाही, अशी कबुली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज मुंबईत दिली. एनआरसी आणि सीएएबाबत सर्व गोष्टींचा नीट अभ्यास केल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही, ही आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईतील चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर 'मिशन २०२२ मुंबई' या कार्यकर्ता शिबिराचे उद्धाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी पटेल बोलत होते. या कार्यक्रमात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र वर्मा, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर, राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार माजीद मेमन, माजी आमदार पंकज भुजबळ आदी नेते उपस्थित होते.