मुंबई:नागालँडचे राष्ट्रवादीचे सात आमदार अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला आणखी धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र नागालँडच्या सात आमदारांनी दिल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले, नागालँड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे आमदार एनडीएमध्ये सहभागी झाले असल्याची माहितीही पटेल यांनी यावेळी दिली. यापुढे नागालँड सह अन्य राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याबाबत पावले उचलली जाणार आहेत.एप्रिल 2023 मध्ये निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष असल्याची मान्यता काढून घेतली. आता राष्ट्रवादी अन्य राज्यांमध्ये पक्षाच्यावतीने निवडणुका लढवणार आहे. पक्षात वेळोवेळी पक्षांतर्गत निवडणुका होणे गरजेचे होते.
42 आमदारांचा पाठिंबा-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटामध्ये नेमके किती आमदार आहेत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 42 आमदारांचा आपल्या गटाला पाठिंबा असल्याचा दावा पटेल यांनी केला. तर विधान परिषदेतील नऊ आमदारांपैकी सहा आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे. याशिवाय नागालँडच्या सातही आमदारांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षांतर्गत निवडणुका नाहीत- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच पक्षांतर्गत घटनात्मक पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत. केवळ अधिवेशन बोलवून नेत्यांना नियुक्त केले जात होते. त्यांना कुणी नियुक्त केले? का नियुक्त केले? याबाबत कधीही चर्चा झाली नाही. पक्षांतर्गत निवडणुकीची कायदेशीर आणि घटनात्मक पद्धतीने कधीही प्रक्रिया राबवण्यात आली नाही, असा आरोप यावेळी पटेल यांनी केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्याबाबत सुनावणी सुरू आहे. मात्र या प्रकरणाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा कोणताही संबंध नाही. त्या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनाबाबत तुलना करण्यात येऊ नये, असे आवाहन पटेल यांनी केले. तर शरद पवार यांचे मतपरिवर्तन व्हावे, यासाठी दररोज प्रार्थना करीत असल्याचे पटेल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
हेही वाचा
- Praful Patel Met Nawab Malik : नवाब मालिक कोणासोबत? भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांनी सांगितले...
- Praful Patel : राष्ट्रवादी पक्ष फुटला? प्रफुल पटेल यांनी थेटच सांगितलं...