मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा मॉर्निंग वॉकला गेले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर आज हल्ला केला. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशपांडे यात गंभीर जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी विधान भवनात निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी देखील याबाबत खंत व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात माझ्यावर देखील असाच हल्ला झाला होता. त्याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, काही दिवसात हल्लेखोराला जामीन मिळाला. सरकारने अशांवर कठोर कारवाई करायला हवी होती. नेत्यांवर हल्ले होण्यामागे राजकीय पाठबळ असल्याचे दिसून येते, असे त्या म्हणाल्या.
हल्ले होणे ही काही सोपे नाही :एखाद्या आमदाराला किंवा राजकीय नेत्याला धमक्या येणे, हल्ले होणे हे काही सोपे नाही. कोणाचा तरी पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी घडू शकत नाही, असे सातव यांनी सांगितले. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला सुरक्षा वाढवून दिल्याचेही त्या म्हणाल्या. संदीप देशपांडे मनसेचे नेते आहेत. राजकीय क्षेत्रात चांगले काम करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झालेला आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय लोकांनी बेसावध राहू नये असे मला वाटते. सभागृहात मनसेच्या आमदार आहेत. मनसे आता आमच्यात सहभागी झाली आहे. सभागृहात यासंदर्भात आम्ही आवाज उठवू, असे भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले. या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी पुढे आलीय, त्याला माझे समर्थन आहे, असे कोळंबकर यांनी म्हटले.