मुंबई - वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना पीपीई किट तसेच फेस शिल्डचे वाटप बुधवारी करण्यात आले. डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एका पत्राद्वारे पीपीई किट आणि फेस शिल्ड देण्याबाबत विनंती केली होती.
कोरोना : नायर रुग्णालयात पीपीई किटसह फेस शिल्डचे वाटप - कोरोना अपडेट मुंबई
देशात कोरोनाचा मोठया प्रमाणावर फैलाव होत असून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किटची अत्यंत गरज आहे. मात्र, त्याचा पुरवठा होत नसल्याने वैद्यकीय कर्मचारी आहे त्या अवस्थेत लोकांची सेवा करीत आहेत.

देशात कोरोनाचा मोठया प्रमाणावर फैलाव होत असून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किटची अत्यंत गरज आहे. मात्र, त्याचा पुरवठा होत नसल्याने वैद्यकीय कर्मचारी आहे त्या अवस्थेत लोकांची सेवा करीत आहेत. परिणामी, अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बाब डॉक्टरांची संघटना मार्डच्या लक्षात आल्यावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून पीपीई किट आणि फेस शिल्ड देण्याबत विनंती करून तसे पत्रक त्यांना दिले. त्यानुसार आज नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी यांची भेट घेऊन कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना सुमारे 2 लाख रुपये किमतीचे पीपीई किट आणि फेस शिल्ड, असे साहित्य देण्यात आले आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी सांगितले.