मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसंदर्भातील पुढील निर्णय 15 जूननंतर घेतला जाणार आहे.
दरवर्षी, 15 मेपासून वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेला सुरूवात होते. मात्र, मागील महिन्याभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. सध्या निवासी परीक्षा पात्र डॉक्टर कोविड-19 कक्षात कार्यरत आहेत. जीवाची बाजी लावत ते कोरोनाशी लढा देत आहेत. तर कोरोनाचा कहर कधी संपणार याचे उत्तर कुणाकडेही नाही. त्यामुळे या डॉक्टरांना पुढील काही महिने रुग्णसेवा करावी लागणार आहे. अशावेळी परीक्षेचे काय असा मोठा प्रश्न होता. त्यानुसार काही दिवसापूर्वीच 15 मे 2020 ची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूढे ढकलत जून 2020 मध्ये घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.