मुंबई- शहरात कोरोना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जनता पूर्वीसारखी कोरोना नियम पाळत नाही, लोक बिनधास्त झाल्याचे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत माहिती देण्यासाठी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच जर तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर तुम्ही नियम पाळणार का? असा सवालही पेडणेकरांनी उपस्थित केला आहे.
पुण्याच्या धर्तीवर मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता
मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लगेच लॉकडाऊन नाही मात्र, पुण्याच्या धर्तीवर निर्बंध लागू होण्याची शक्यता असल्याचे मत पेडणेकरांनी व्यक्त केले आहे.
कोरोना रुग्णांनी उपलब्ध बेडस् घ्यावेत
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमांने पावले उचलत आहेत. जनतेनेही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, लोक तसे करताना दिसत नाहीत. अनेक वेळा कोरोना बाधित रुग्ण आवडीच्या रुग्णालयाची मागणी करतात. मात्र, जर त्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसतील तर विनाकारण वेळ जातो आणि नाहक त्रासही होतो. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी उपलब्ध बेड्स घ्यावेत, अशी विनंती महापौर किशोरी पेडणेकरांनी केली आहे.