मुंबई- माझ्या मतदारसंघातील कोणत्याही कामाला मी नाही म्हटले नाही. प्रत्येकांचे कामे त्या त्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून लोकांना विश्वास दिला. आता त्यांचे इतर प्रश्नही सोडवायचे आहेत. यासाठीच मला त्यांचा दुवा बनून काम करायचे असल्याचे भाजपच्या उत्तर मध्य मुंबईतील लोकसभेच्या उमेदवार पूनम महाजन यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
'ई-टीव्ही भारत' प्रतिनिधी संजीव भागवत यांनी पूनम महाजन यांच्यासोबत केलेली बातचीत त्या म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात आणि देशातही आता परिस्थिती बदलली आहे. धर्म, जाती आदींच्या नावाखाली लोकांना तोडण्याचे दिवस संपलेले आहेत. लोक आता कामाकडे पाहतात त्यामुळे कामाची प्रगती पाहूनच ते आपल्याला पसंत करणार आहेत. मी लोकांमध्ये आज जे येत आहे ते केवळ माझे प्रगतीपुस्तक घेऊनच. त्यामुळे मला जनता माझे प्रगतीपुस्तक पाहून मला भरभरून प्रतिसाद देत आहे.
लोकप्रतिनिधींनी काम नाही केले तर जनता त्यांना विचारणार नाही. माझ्या कार्यकाळात मी सर्वाधिक निधी लोक विकासासाठी खर्च केला. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होते. आज मी जे खासदार झालेले आहे त्याचे श्रेय सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. कारण आम्ही जिथे बसलोय ते केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. त्यामुळे त्यांच्या जयंतीचा हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आम्ही मागील काही काळात बाबासाहेब हे जगभरातील लोकांना कळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रम सुरू केले असल्याचेही महाजन म्हणाल्या.
माझ्या मतदारसंघात लोकांच्या घरांचे सर्वात मोठे प्रश्न होते. त्याचे मी निवारण केले आहे. जिल्हाधिकारी अथवा वनजमिनीच्या जागांवर असलेल्या घरांचे प्रश्न सुटले जात नव्हते, परंतु तुम्ही त्याचे निवारण केले आहे. आता लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढत आहेत आणि त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठीच मला लोकांचा दुवा बनायचे आहे. मी कधीही कोणत्या कामाला नाही म्हटले नाही. लोकांना प्रत्येक वेळी विश्वास दिला आणि त्या विश्वासाची पोचपावती म्हणूनच लोकांनी मला २०१४ मध्ये निवडून दिले. आता मी त्यांच्या विकासासाठी संकल्प सोडून काम करत आहे. आम्हाला जनतेला लाभार्थी बनवून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठीच मी माझे प्रगती पुस्तक घेऊन जनतेमध्ये उतरले असल्याचेही पूनम महाजन म्हणाल्या.
दरम्यान, आज कुर्ला पश्चिमच्या सर्वेश्वर मंदिर येथून पूनम महाजन यांनी आपली प्रचार रॅली काढली. या रॅलीत युतीत सामील असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक शाखानिहाय कार्यकर्त्यांसह रिपाई आठवले गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक ठिकाणी महाजन यांचे स्थानिक संस्था, पदाधिकारी, महिला मंडळे यांच्याकडून स्वागत केले जात होते.