मुंबई -उगवत्या सूर्याला वंदन करत बुधवारी धारावीतील हजारो तमिळ नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला. पहाटे रंगलेला अविस्मरणीय सोहळा टिपण्यासाठी धारावीतल्या नाईन्टी फूट रस्त्यावर स्थानिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. पारंपरिक उत्सव साजरा करण्यासाठी तमिळ बांधव मोठ्या उत्साहात आणि आनंदात असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले.
हेही वाचा -शरद पवार काल, आज आणि उद्याही आमचे 'जाणता राजा'च.. मुंबईत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
धारावीमध्ये तसेच मुंबईतील सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर याठिकाणी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मकरसंक्रात म्हणजे दक्षिणेत पोंगल म्हणून साजरा केला जातो. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. पोंगल हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो, तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशुधनाची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीच्या उत्सवात तमिळ भगिनींचा मोठ्या प्रमाणात आज हिंदी भाषिक लोक देखील या ठिकाणी सहभागी झाल्याचे दिसले. उत्सवानिमित्ताने धारावीत एक हजार पेक्षा अधिक चुली मांडल्या गेल्या होत्या. त्यामुळे धारावीतील अत्यंत वर्दळीचा नाईंटी फूट रस्ता काही काळासाठी एक मार्गी करण्यात आला होता. या सामूहिक उत्सवाचे आयोजन हिंदू युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते.