मुंबई :ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली. त्या कारणाने शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. "कानामागून आली व तिखट झाली". या म्हणीप्रमाणे मागून येऊन सत्तेत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू लागल्याने शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही करण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता अजित पवार गटही आग्रही झाला असून याबाबत शिंदे गट व भाजपाने संयमाची भूमिका घेतली आहे.
फडणवीसांनी सावरले अन्यथा... : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण करत नाही तोच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सामील झाले. त्यानंतर राज्यात शिंदे, फडणवीस व पवार असे महायुतीचे सरकार स्थापन झाले. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून भाजपाच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांमध्येसुद्धा अस्वस्थता होती. राज्यात सरकार स्थिर असताना व पूर्णपणे बहुमत पाठीशी असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची गरज काय? असे प्रश्न दोन्ही बाजूने उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री यांनीसुद्धा त्यास प्रत्युत्तर दिले. परंतु हा वाद आणखी वाढू शकतो असे लक्षात आल्याने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली व या विषयावर पडदा टाकला. नाहीतर शिंदे व पवार यांच्यातील संवाद पुढे वाढत जाऊन त्याचे रूपांतर वादात झाले असते.
सरकार व्यवस्थितपणे काम करत आहे. आम्हाला कोणतीही घाईगडबड नाही आहे. परंतु शिवसेनेवर दबावतंत्र नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजूबाजूला असणारे अधिकारी सर्व बाबींचा आढावा घेत असतात. ते त्यांना योग्य पद्धतीने ब्रीफिंग करत असतात. झोपेतून उठून सरकार चालत नाहीत. तुम्ही जर या विषयाला वेगळ्या पद्धतीने घेत असाल तर आम्हाला शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तार झाला काय, नाही झाला काय, आम्हाला त्या विषयात काही फरक पडत नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. परंतु अजित पवार ज्या पद्धतीने आमच्यावर दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ठरवून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत आहेत हे फार चुकीचे आहे. - वैजनाथ वाघमारे, प्रवक्ता, शिंदे गट
अजित पवार गटाची चांदी होईल :अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने याची चीड पूर्वीपासूनच भाजपा तसेच शिंदे गटाच्या आमदारांमध्ये, नेत्यांमध्ये आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून तशा पद्धतीचे फलक राज्यात झळकू लागल्याने अजित पवारांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. त्या पद्धतीने ते पुढची वाटचाल करत आहेत असे एकंदर चित्र भाजपा तसेच शिंदे गटाच्या नजरेतून सुटताना दिसत नाही. अशातच एक वर्षापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त अजित पवार गटालाच समाविष्ट करून घेतल्याने ती आगसुद्धा शिंदे गटात आजही धुमसत आहे. अशातच आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी अजित पवार गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिंदे गट व भाजपाच्या नेत्यांनी याबाबत संयमाची भूमिका घेतली आहे. कारण निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना विनाकारण या मंत्रिमंडळ विस्तारामध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची चांदी होईल, याची दाट शक्यता शिंदे गट तसेच भाजपला वाटत आहे.
हेही वाचा -
- CM visit KEM Hospital: मुख्यमंत्र्यांची केईएम रुग्णालयाला अचानक भेट; बंद असलेले ६ वॉर्ड दुरुस्त करण्याचे आदेश
- 'तुमच्या काळातही असा निर्णय झाला नव्हता', कांदा प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना उत्तर
- Talathi Bharti Exam: तलाठी परीक्षेत राज्यभरात गोंधळ..विजय वडेट्टीवार यांची शिंदे सरकारवर टीका