बुलढाणा : समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताविषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली असून या बसमधील 25 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. हा अपघात सिंदखेडराजा जवळ घडला.
बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले- पंतप्रधान मोदी :
महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली मदत :
बुलडाणा जिल्ह्यातील अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 8 लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रध्दाजंली : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुलढाणा अपघातवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे.
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु: खद आहे. अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ मिळावे, अशी प्रार्थना करतो. - नितीन गडकरी
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अपघातवर शोक व्यक्त केला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाय योजना त्वरीत कराव्यात अशी सूचनाही शरद पवार यांनी यावेळी केली.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना. या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
सुप्रिया सुळे :
सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा ही विनंती. - सुपिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह :
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रस्ता अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या क्षणी या भीषण अपघातात ज्यांनी प्राण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आहेत. प्रशासनाकडून जखमींवर त्वरित उपचार केले जात आहेत. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
हेही वाचा -
Accidents On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले; संशोधनातून 'हे' कारण आले समोर
Samruddhi Highway Accident : कारंजात चालक जेऊन झोपला, तो कायमचाच; बसमधील प्रवाशांच्या मृतदेहाचा झाला कोळसा तर काही अर्धवट जळाले