मुंबई - सरकारच्या चारा छावण्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण संकट असताना, जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करुन देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून करोडो रुपयांचे अनुदान लाटले असल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे. तसेच सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या घोटाळेबाजांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
राज्यातील चारा छावण्यांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या व त्यातून करोडो रुपयांचे सरकारी अनुदान लाटले. चारा छावण्यांमधे जनावरांची संख्या जास्त दाखवून मलिदा लाटण्यात आला. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची तपासणी केली असता, या छावण्यांमध्ये प्रत्यक्षात कमी प्रमाणात जनावरे दिसून आली. अनुदान मात्र जास्त जनावरांचे लाटण्यात आल्याचे उघड झाले आहे.