मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षामध्ये खळबळ माजली आहे. शरद पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? याबाबत चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवली जाणार का सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल का किंवा छगन भुजबळ यांच्याकडे सूत्रे दिली जातील काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र या सर्वात सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आणि सर्वमान्य होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सुप्रिया सुळे? :सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचे शिक्षण पुण्यातील नाना चौकातील सेंट कोलंबस हायस्कूल मध्ये झाले. बारावीनंतर सुप्रिया सुळे यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली. त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पवार मुख्यमंत्री असताना सुप्रिया मात्र, बसने कॉलेजला जात होत्या. त्यांना दररोज दहा रुपय पॉकेट मधून दिले जायचे.
सुप्रिया पवार यांचा विवाह? :महाविद्यालयीन जीवनातच सुप्रिया पवार यांचा सदानंद सुळे यांच्याशी कौटुंबिक कार्यक्रमात संपर्क आला. या ओळखीनंतर सुप्रिया यांनी सदानंद सुळे यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखराव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने या दोघांचे लग्न करण्यात आले. लग्नानंतर सुप्रिया सुळे आपल्या नवऱ्यासोबत परदेशात गेल्या. परदेशात असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातून जलप्रदूषण या विषयात पदव्युत्तर पदविका धारण केली. त्या काही काळ सिंगापूर आणि इंडोनेशियातील शहरांमध्ये राहिल्या. त्यानंतर त्या भारतात परतल्या. सुप्रिया सुळे यांना रेवती आणि विजय अशी दोन अपत्ये आहेत.