मुंबई- फुकटची जाहिरात करण्यासाठी फलक आणि होर्डिंग्सचा आधार राजकीय पक्ष तसेच कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. रविवारी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू झाली. मात्र, त्यानंतरही मुंबईत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे होर्डिंग नाक्या-नाक्यावर दिसत आहेत. त्यामुळे पालिकेकडून या होर्डिंग्सवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आचारसंहितेनंतरही मुंबईत राजकीय होर्डिंग्स, पालिकेचे दुर्लक्ष - दुर्लक्ष
आचारसंहिता लागू झाली. मात्र, त्यानंतरही मुंबईत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे होर्डिंग नाक्या-नाक्यावर दिसत आहेत. त्यामुळे पालिकेकडून या होर्डिंग्सवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आचारसंहिता लागण्याआधी मोठ्या प्रमाणात भूमिपूजन आणि उद्धाटने केली जातात. त्यासाठी अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि नेत्यांचे फलक आणि होर्डिंग्स लावले जातात. वास्तविक पाहता संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन आणि भुमीपूजन झाल्यावर संबंधित फलक, होर्डिंग काढणे गरजेचे आहे. मात्र, आचारसंहिता लागून २ दिवस झाले तरीही, अनेक ठिकाणचे होर्डिंग्स काढण्यात आलेले नाहीत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी कारवाई सुरू आहे, असे होर्डिंग्स दिसल्यास ती जप्त करून कारवाई केली जात असल्याचे सांगितले.
२०१८ मध्ये महापालिकेने ११ हजार २०२ होर्डिंग्ज आणि फलक काढले होते. यापैकी राजकीय पक्षांच्या होर्डिंग्सचे प्रमाण ६ हजार ५३५ होते, त्यापैकी २ हजार ८३ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. २०१७ मध्ये महापालिकेने १६ हजार ४१३ होर्डिंग्स काढले होते. यापैकी १३ हजार ३१२ राजकीय होर्डिंग्स होते. बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करताना २ शस्त्रधारी पोलीस कर्मचारी असावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.