मुंबई -गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहे. त्यातच काही दिवसात गुप्त बैठकाही वाढलेल्या आहेत. शनिवारी (दि. 3 जुलै) शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांची नरिमन पॉईंट येथे सुमारे एक तास गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे.
शिवसेना नेत्यांच्या पाठी लागलेल्या सीबीआय आणि इतर तपास यंत्रणेचा ससेमिरा त्यांचा पाठलाग काही सोडताना दिसत नाही. त्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील भारतीय जनता पक्षाची जवळकी साधा, असे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. त्यातच राज्यात आता सुरू झालेल्या गुप्त बैठकांमुळे सरकार पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. मात्र, काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असा दावा वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथे गुप्त भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांची वाहने एकाच इमारतीतून बाहेर आल्याचे दिसत आहे. यामुळे या चर्चेना उधाण आले आहे.
दोन्ही नेत्यांचा नकार
मात्र, अशी कोणतीही आमची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी दिले आहे. मात्र, कॅमेऱ्यात दिसणाऱ्या या दोघांच्या गाड्यांचा ताफा तिथे काय करत होता. हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.