मुंबई :महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे आता हळूहळू बदलताना दिसू लागली आहेत. विदर्भ मराठवाड्यातील अनेक माजी आमदार तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाकडे वळताना दिसत आहेत. राज्यातील अनेक माजी आमदारांनी चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला आहे. राज्यातील विविध बड्या पक्षांचे नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत नेमके का जात आहेत, यामुळे राज्यातील राजकारणामध्ये काय फरक पडू शकेल? याविषयी जाणकारांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, बीआरएस या पक्षाने महाराष्ट्रात जरी तात्पुरती मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला असला तरी ही निवडणुकीपूर्वीची गणिते आहेत. निवडणुका जवळ येतील, तसेच चित्र वेगळे असू शकते मात्र बीआरएसला फार काही पाय रोवता येईल, असे चित्र नाही.
शेतकऱ्यांना मोफत वीज पाण्याची घोषणा :तेलंगणा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणामध्ये जे काही प्रयोग केले, ते अभूतपूर्व प्रयोग आहेत. त्यांचा प्रचंड गाजावाजा होत आहे. शेतीला मोफत वीज आणि मोफत पाणी या दोन गोष्टींमुळे महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. म्हणूनच अनेक माजी आमदार आज प्रामुख्याने केसीआर यांच्या भारत पक्षामध्ये सहभागी होत आहेत. माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. त्यांना असे वाटते, के सी आर यांच्या योजनांमुळे शेतकरी आकर्षित होतील. त्यांना मतदान देऊन निवडून आणतील. या एकाच कारणासाठी हे लोक आज त्यांच्याकडे जात आहेत.
राजकीय अस्तित्वासाठी पक्षांतर : खरे म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे लोक केसीआर यांच्याकडे जात आहेत. महाराष्ट्रमध्ये आज त्यांना विचारणार कोणीच नाही, म्हणून आज केसीआरकडे जाणारा ओघ आहे, हा कालांतराने थांबेल. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काय निकाल लागला असेल, हे आपल्याला पहावे लागेल. मात्र केसीआर यांच्या पक्षाला महाराष्ट्रात फार स्थान मिळेल, अशी परिस्थिती नाही. यापूर्वी एमआयएमने हा प्रयोग करून पाहिला, पण त्यांना यश आले नाही अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषण विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.