मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करत अयोध्या दौरा काढला. राज्यात अवकाळी, गारपीट होत असताना, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला गेले, अशा शब्दांत विरोधकांनी टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांनी यावर प्रत्युत्तर देताना, हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख केला. येत्या काही महिन्यांत आगामी निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे आहेत. शिंदे सेना, भाजपला अयोध्या दौरा फलदायी ठरेल. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व सोडून राज्यातील जनसमुदाय हिंदुत्व स्विकारतील, असा शिंदे सेनेला आत्मविश्वास आहे. परंतु, महाराष्ट्रात आजवर धर्माच्या मुद्द्यावर राजकारण खपवून घेतले जात नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतांचा जोगवा :दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंना देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कधीही मते मिळाली नाहीत. उलट सहा वर्षासाठी त्यांना मतदानास बंदी घातली होती. आताच्या राजकारण्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व्याख्या बदलून हिंदुत्वाचा विचार मते मिळवण्यासाठी करत आहे. भारतातील जनता सुज्ञ आहे. लोकशाही काय आहे, हे जनता चांगलीच जानते. त्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता ठाम उभी राहत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. परंतु, काही वेळेला लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, राजकीय लोक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहेत. एकनाथ शिंदे किंवा भाजप असो, आगामी निवडणुकीत हिंदुत्वाच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतील, असे किंचित ही वाटत नाही. आज देशात, महाराष्ट्रात जटील प्रश्न आहेत. केवळ घोषणांवर शासन आणि राजकारण चालत नाही. चांगल्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज आहे. शिंदे सरकार मध्ये अंमलबजावणीचा अभाव आहे. त्यामुळे सध्या हिंदुत्वाचा स्तोम माजवला जातो आहे. राजकारणात त्याचा फार काही फायदा होईल, असे वाटत नाही. आधी प्रश्न सोडवा, हिंदुत्वाचे नंतर बघू, अशी सर्वसाधारण भावना आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी मांडले.
धर्माच्या नावावर राजकारण होऊ नये :राज्यात हिंदुत्वाच्या नावाखाली, राजकीय पोळी भाजली जात आहे. महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावरुन लक्ष विचलीत करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. लोकांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जातो आहे. आजवर धर्माचे राजकारण खपवून घेतले जात नाही. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना मतदार चांगला धडा शिकवतील, असे राजकीय विश्लेषक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. तसेच धर्माच्या नावावर राजकारण होऊच नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिंदेंना फायदेशीर वातावरण :अयोध्या दौऱ्यानंतर शिंदे गटाला फायदेशीर वातावरण आहे. भगव्याची लहर महाराष्ट्रात निर्माण होईल. शिंदे सेना आणि भाजप हे भगवाधारी एकत्र काम करतील. २०२४ मध्ये महाविकास आघाडी भगवाधाऱ्यांपुढे टीकणार नाही. युतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप आणि आम्ही हिंदुत्वाच्या विचारांवर काम करत आहोत. २०१९ मध्ये झालेली चुक दुरुस्त करत आहोत. महाराष्ट्रात छत्रपती शिवराय, हिंदुत्ववादी, प्रभू श्रीराम यांच्या विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आगामी काळातील निवडणुका भाजप, शिवसेना एकत्र लढवून बहूमताने सरकार स्थापन करु. महाविकास आघाडी असो किंवा उद्धव ठाकरे यांनी किती ही वज्रमूठ बांधली तरी भगवाधाऱ्यांपुढे ते टीकणार नाहीत, असा विश्वास शिंदे सेनेचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला.