महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय विशेषज्ञ प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यात खलबते - prashant kishor and sharad pawar meeting

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीमध्ये देश पातळीवरच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून कसे रोखता येईल आणि या निवडणुकीसाठी कोणता चेहरा वापरणे योग्य असेल याबाबत महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 11, 2021, 7:02 PM IST

Updated : Jun 11, 2021, 7:12 PM IST

मुंबई- प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीमध्ये देश पातळीवरच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून कसे रोखता येईल आणि या निवडणुकीसाठी कोणता चेहरा वापरणे योग्य असेल याबाबत महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (दि. 11 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची भेट झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घर सिल्वर ओकला जाऊन त्यांची भेट घेतली. जवळपास तीन तास या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीत देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान देशातील अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं माहिती समोर येत आहे. प्रशांत किशोर यांना शरद पवार यांची भेट झाली असून देशाच्या राजकीय परिस्थितीवर या भेटीदरम्यान चर्चा झाली असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लावले जात आहेत.

या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आलेले मुद्दे

इतर राज्यात 'बंगाल मॉडल' लागू करता येऊ शकतं का..?

देशात होणार्‍या इतर राज्यात पश्चिम बंगाल मॉडेल राबवले जाऊ शकतो का, या मुद्यावर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. या निकालामागे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी महत्त्वाची रणनीती आखली होती. ममता बॅनर्जी यांच्या मागे रणनीती उभी करण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले होते. तर, पश्चिम बंगालमध्ये विरोधकांची मते विभागली जाऊ नयेत, याची खबरदारी शरद पवार यांनी घेतली होती. ते स्वतःही ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र, त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पश्चिम बंगालला प्रचारासाठी जाता आले नव्हते. तरीही शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी संपूर्ण ताकत ममता बॅनर्जी यांच्या मागे उभी करून त्यांना बहुमत मिळवून देण्यास मदत केली होती. तीच पद्धत आता येणाऱ्या इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथे देखील राबवता येऊ शकेल का, याची चाचपणी या बैठकीमध्ये झाली. खास करून पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे नेहमीच देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाला सत्तेपासून रोखता येऊ शकेल का, याची चाचपणी या बैठकीत झाल्याचे समजते.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुक बाबत चर्चा

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबतही शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधात कोणता चेहरा वापरला जावा. याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांचे नेतृत्व करावे. त्यामुळे देशपातळीवर राजकीय वर्तुळात कोणते प्रभाव पडतील याबाबत प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे.

राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडी

2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचा असेल, तर देश पातळीवरील सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल. यासाठीची मोठे बांधण्याचे काम केवळ शरद पवार करू शकतात. त्यासाठी त्यांनी आतापासूनच पुढाकार घ्यावा. भाजप विरोधी आघाडी तयार करावी, असा मुद्दाही प्रशांत किशोर यांनी या बैठकीत शरद पवार यांच्या पुढे ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस किती तयार..?

नुकत्याच झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष किती तयार आहे, याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते आहे. यासोबतच राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर ठेवून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना कितपत यश येऊ शकते. याबद्दलही महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाली आहे.

देशातील कोविड परिस्थितीवर चर्चा

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्र सरकारची प्रतिमा ही जनसामान्यात मलिन झाली आहे. जनसामान्यात केंद्र सरकार तसेच पंतप्रधान यांच्याबद्दल रोष आहे. या रोषाचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला बसणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जनसामान्यांचा असलेला हा रोष येणाऱ्या निवडणुकीत किती प्रभावशाली असेल, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच जनसामान्याचा हा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत चर्चा

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात महाराष्ट्राच्या राजकीय मुद्द्यांवर देखील चर्चा झाली असल्याचे समजते. राज्यात महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे, महाविकास आघाडी सरकारने हाताळलेली कोविड परिस्थिती याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. तसेच महाराष्ट्राच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा या बैठकीत झाली. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते कार्यक्रम आखले पाहिजेत जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीमध्ये थेट फायदा होऊ शकेल, याबाबत देखील महत्त्वाची चर्चा झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेस बाबतच्या चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा सध्या जनमानसामध्ये चांगली आहे. खास करून कोविड परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार देशाच्या इतर राज्यांपैकी चांगलं काम करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची सामान्य नागरिकांवर नेमकी काय छाप आहे? याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते.

हेही वाचा -राज्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर; 'या' जिल्ह्यांत इतक्या इमारती धोकादायक

Last Updated : Jun 11, 2021, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details