राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांची प्रतिक्रिया मुंबई :राज्यातील बंडखोरी नाट्याच्या दुसऱ्या अंकानंतर राज्यात आता मुख्यमंत्री पदावरून जोरदार उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांना कदाचित मुख्यमंत्रीपदी बढती दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या शक्यतेला जोरदार पाठबळ दिले जात आहे. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला वाटा, त्यांचा प्रभाव पाहता शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा निष्प्रभ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने ही कंबर कसली आहे. आपले राजकीय महत्त्व कमी होणार नाही याची शिंदे गट काळजी घेत आहे,असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री पदाची शर्यत राहणार :आता राज्यामध्ये नव्याने जुळलेल्या समीकरणांमध्ये शिवसेना शिंदे गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांची महत्त्वाकांक्षा ही नेहमी उच्च पदासाठी राहिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते आपोआप आले आहेत. त्यांनी स्वतःही त्याबाबत स्पष्टपणे सांगितलेले आहे.
राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे अधिक जोराने वाहू लागले आहेत. मात्र सद्यस्थितीत मुख्यमंत्री बदल होणार की नाही? हे जरी स्पष्ट नसले तरी, या दोन्ही पक्षांमध्ये यानिमित्ताने संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. कारण शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेत सहभागी होणे फारसे रुचलेले नाही- चंदन शिरवाळे
काय आहे कारण? :राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा नुकताच मुंबईतील वांद्रे येथे घेतला. या मेळाव्यात बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलो आहे. आता मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे स्पष्टपणे बोलून दाखवले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली, अखेर शिवसेना शिंदे गटाचे नेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य करीत, राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची कोणतीही परिस्थिती नाही. मुख्यमंत्री बदलाची गरजही नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा दावा केला आहे.
सध्या भारतीय जनता पक्षाला राज्यातील सत्ता अस्थिर करण्यामध्ये कोणताही रस नाही. त्यामुळे किमान 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी राज्यामध्ये मुख्यमंत्री बदल होणार नाही. अजित पवार हे अतिशय महत्त्वाकांक्षी राजकारणी आहेत. त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही, हे जरी सत्य असले तरी सद्यस्थितीत त्यांना मुख्यमंत्री होता येणार नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे. - अनिकेत जोशी
मुख्यमंत्री बदलला जाणार नाही :या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने सध्या राज्यात राजकारण करण्याला प्राधान्य दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यातून 40 ते 42 खासदार निवडून आणायचे आहे. त्यासाठी ते सर्व तऱ्हेचे प्रयत्न करत असून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेणे हा त्याचाच एक भाग आहे. परंतु असे असले तरी, शिवसेना शिंदे गटाने भाजपला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिंदे गटाला दूर करून राष्ट्रवादीच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवले जाईल, अशी कुठलीही शक्यता दिसत नाही.
हेही वाचा -Sharad Pawar NCP Meeting : बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार