मुंबई- भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शरद पवारांनी नवीन आघाडीसाठी मोर्चेबांधणी तयारी केली आहे. यासाठी दिल्लीत 'राष्ट्रमंच' महत्वाची बैठक बोलवण्यात आली. मात्र, या बैठकीतून काँग्रेसला दूर ठेवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला काँग्रेस वगळता इतर पर्याय निर्माण होऊ शकतो का यासाठीची ही शरद पवारांची तयारी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 22 जून) दिल्लीमध्ये बैठक बोलावली. या बैठकीतून शरद पवार नवीन आघाडीबाबत चाचपणी करत आहेत. या बैठकीसाठी बिगर भाजपा आणि खास करून प्रादेशिक पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच काही सनदी अधिकारी आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले. मात्र, या बैठकीला मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाला आमंत्रण नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीसाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह 15 पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले. मोदी विरोधक मानले जाणारे यशवंत सिन्हा यांच्या 'राष्ट्र मंच'च्या बिगर राजकीय संस्थेच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत खास करून देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, देशातील कोविड परिस्थिती आणि कोविड परिस्थितीत केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीतून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला काँग्रेस हा पर्याय असू शकत नाही का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. नवीन आघाडीतून काँग्रेसला दूर ठेवून एक नवीन पर्याय जनतेसमोर उभा करण्याचा प्रयत्न शरद पवारांचा असल्याचे मत राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसला आघाडीतून वगळले जातेय ?
2024 च्या लोकसभा निवडणूक लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत पराजीत करण्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र करुन मोठ बांधण्याची सुरुवात या बैठकीतून झाल्याचे समोर येते. मात्र, सध्या केंद्रामध्ये मुख्य विरोधी पक्षाला या बैठकीतून बाजूला ठेवल्या गेल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजूनही काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहिले जात नाही, अशी मानसिकता विरोधी पक्षांच्या नेत्यांची तयार झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला जनतेसमोर ठेवून निवडणूक लढवली गेली तर, यश मिळेल का ? याबाबत अनेक पक्षांना अजूनही संशय आहे. काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांना पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले गेले नसले तरी, काँग्रेस पक्ष भावी पंतप्रधान म्हणूनच त्यांच्याकडे पाहत आहे. मात्र, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले तर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जाईल ही भीतीही इतर पक्षांना आहे. त्यामुळे नवीन आघाडी तयार करताना काँग्रेस पक्षाला सध्या तरी बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या ताकतीची चाचपणी या बैठकीतून शरद पवार घेत आहेत.
शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या आशा अजूनही पल्लवित