मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल सरकारला अल्टिमेटम देऊनही सरकारनं काहीही केलं नसल्यामुळं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) जालन्यात उपोषणाला बसले आहेत. यामुळं राज्यातील मराठा तरुण आक्रमक झाला आहे. याचे पडसाद आज मुंबईत पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाच्या काही तरुणांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली.
पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार : मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन रान उठवलं आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर यावर मराठा समाजातच मतमतांतर आहे. दुसरीकडे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला असताना, आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मागील वेळी जालन्यातील आतंरवाली सराटीत उपोषण केलं तेव्हा, आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. हा लाठीचार्जचा आदेश देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला होता. असा कयास मराठा समाजातील अनेकांचा आहे. जरांगे पाटील यांच्या २० दिवसांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देत, जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न ४० दिवसांच्या आत मार्गी लावू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र ४० दिवसांनंतर हा प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयश आल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्यात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
फडणवीस झारीतील शुक्राचार्य : मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) सरकारला अल्टिमेटम देऊनही सरकारने काहीही केलं नसल्यामुळं पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील जालन्यात उपोषणाला बसले आहेत. यामुळं राज्यातील मराठा तरुण आक्रमक झाला आहे. याचे पडसाद आज मुंबईत पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाच्या काही तरुणांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. तर मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांची नावे उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचा अंगुली निर्देश कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जालन्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना जो लाठीचार्ज झाला होता. त्याला कारणीभूत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे-पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच त्यांनी फक्त माफी मागितली होती. पण उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, पण फडणवीस आले नव्हते. तसंच जालन्यातील आंदोलन झाल्यानंतर ओबीसी आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन सोडण्यास स्वत: देवेंद्र फडणवीस गेले होते. तसंच ओबीसी हा आमचा डीएनए असल्याचं म्हणत त्यांनी मराठ्यांचा रोष ओढावून घेतला होता. त्यामुळं जरांगे पाटलांचं बोट फडणवीसांकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार हे सुद्धा वारंवार मराठा आरक्षणावर बोलत असतात, त्यामुळं यांचाही मराठा आरक्षणाला विरोध आहे का? यांची नावे जरांगे पाटील घेणार का, याची सुद्धा चर्चा सुरू आहे.