महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचं धक्कातंत्र; खासदारांसह इच्छूक उमेदवारांचे दणाणले धाबे - विद्यमान खासदारांचे धाबे

Lok Sabha Election २०२४ : देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडं आताच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीमध्ये भाजपाने नवीन चेहरे समोर आणले असल्याकारणाने राज्यातील भाजपाच्या बऱ्याच नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Fadnavis And Modi
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 5:19 PM IST

Updated : Jan 1, 2024, 6:03 PM IST

मुंबई Lok Sabha Election २०२४: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकीकडे जुंपली असताना, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये विशेषतः विद्यमान खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. याचं कारण म्हणजे पुन्हा उमेदवारी भेटेल की नाही? याची कुठलीही शाश्वती नाही. विद्यमान खासदार तसेच इच्छुक उमेदवारांनी सुद्धा कुठल्याही पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करू नये. असं केल्यास त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असा सज्जड दम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नेत्यांना दिला आहे.



कार्यक्षमता असेल तर सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी: यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यात मिशन ४५ टार्गेट केलं असून त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आत्ताच झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने तेथे सत्ता काबीज केली. यानंतर धक्कातंत्राचा अवलंब करत जवळपास बहुतेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यामुळं पक्षांमध्ये नवीन नेतृत्व निर्माण करण्याचा भाजपाचा हेतू तर आहेच. परंतु लोकसभा निवडणूक पाहता जातीय समीकरणे जोडण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला गेला आहे. भाजपाने राजस्थानमध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या 'भजनलाल शर्मा' यांच्याकडं मुख्यमंत्री पदाची धुरा देऊन सर्वांनाच अचंबित केलं आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 'मोहन यादव' या इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला संधी देऊन भाजपाने नवीन समीकरणे आखली आहेत. तसेच छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आदिवासींची संख्या पाहून भाजपने 'विष्णुदेव साय' या माजी केंद्रीय मंत्र्यांकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली गेली.


तर सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळू शकते: वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान यासारख्या मातब्बर नेत्यांना भाजपाने चलाखीने मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यामुळं या मुख्यमंत्री निवडीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जर कार्यक्षमता असेल तर सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळू शकते. हा मोठा संदेश भाजपा कार्यकर्त्यांना दिला असल्याकारणाने, यामुळं तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह संचारला आहे. विधानसभा निवडणुकीतून भाजपाने दिलेला हा संदेश लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांनी तसेच उमेदवारीसाठी इच्छुक वरिष्ठ नेत्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दावा कायम समजू नये, हा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला आहे.



उमेदवारी संदर्भामध्ये संसदीय मंडळाकडून निर्णय: नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा मोठा वाटा यात असणार आहे. त्यादृष्टीने राज्यातही भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी कुठल्याही परिस्थितीत नेत्याने पक्षाला गृहीत धरू नये. तसेच उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि इतर बाबी बघूनच उमेदवारी संदर्भामध्ये संसदीय मंडळाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. पक्षावर दबाव बनवण्यासाठी कोणीही फलकबाजी किंवा इतर माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी दिली जाणार नाही, असा सज्जड दम देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत दिला असल्याकारणाने, याबाबत अनेकांचे धाबे दणाणले आहेत.



विद्यमान खासदारांच्या कामगिरीबद्दल नकारात्मक अहवाल : भाजपाने यापूर्वीच राज्यातील खासदारांचे रिपोर्टकार्ड तयार केलं आहे. त्या रिपोर्टकार्ड नुसार कुणाला संधी द्यायची आणि कुणाला घरी बसवायचं हे ठरविलं जाणार आहे. ज्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे, त्यांना याची कुणकुण लागली असल्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण भाजपाने अंतर्गत केलेल्या सर्वेत जो अहवाल सादर झाला आहे, त्या अहवालाप्रमाणे भाजपाच्या काही विद्यमान खासदारांच्या कामगिरीबद्दल नकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. त्या खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे. तसेच जर का भाजपाच्या विद्यमान खासदाराची निवडून यायची शाश्वती नसेल तर त्या ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन ती जागा निवडून आणली जाऊ शकते का? याची चाचपणी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ प्लस जागा निवडून आणण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे.



नाराज इच्छुक उमेदवारांची मनधरणी : महाराष्ट्रमध्ये महायुतीचं सरकार असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गट) त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनाही जागा सोडाव्या लागणार आहेत. या जागेवर आतापासून मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू असून गरज पडल्यास भाजपाच्या काही इच्छुक नेत्यांना सुद्धा त्यांच्या उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे. याबाबतचे संकेत ३ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपाचे इच्छुक उमेदवार वेळप्रसंगी महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. अशा नाराज इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्याची मोठी जबाबदारी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांवर असणार आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस
  2. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन रामदास आठवलेंची मोठी मागणी, आरपीआयसाठी मागितल्या 'इतक्या' जागा
  3. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
Last Updated : Jan 1, 2024, 6:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details