महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात नवीन राष्ट्रीय आघाडी तयार आहे का? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचे मत

नवीन राष्ट्रीय आघाडी तयार करण्याची चर्चा सुरू झाली असली तरी, पराभवाच्या छायेतून अजून काँग्रेस बाहेर पडली नसल्याने अशी आघाडी शक्य नसल्याचे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.

indian national congress
देशात नवीन राष्ट्रीय आघाडी तयार आहे का? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचे मत

By

Published : May 10, 2021, 9:34 PM IST

मुंबई -देशात नवीन राष्ट्रीय आघाडी तयार करण्याची चर्चा सुरू झाली असली तरी, काँग्रेसचे अंतर्गत प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तसेच पराभवाच्या छायेतून अजून काँग्रेस बाहेर पडली नसल्याने अशी आघाडी शक्य नसल्याचे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावात अशी आघाडी जनतेलाही पटणार नसल्याचे ते म्हणाले.

संदीप प्रधान यांची प्रतिक्रिया

...तर या आघाडीचा आत्मा काँग्रेस असेल -

देशात राष्ट्रीय आघाडी तयार करायचे असल्यास या आघाडीचा आत्मा काँग्रेस शिवाय दुसरा कोणताही पक्ष असू शकत नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्याने आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. वेगवेगळ्या नेत्यांकडून या वक्तव्याचे कांगोरे काढण्यात येत आहेत. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी देशात एक नवीन राष्ट्रीय आघाडी असावी. तसेच या आघाडीत काँग्रेस पक्ष हा महत्त्वाचा आहे. याबाबत चर्चा केली असल्याची माहिती दिली. याआधी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावे, अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊत यांनी अनेक वेळा केले आहेत. यावरून महाविकास आघाडीमध्ये वेळोवेळी वादही निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या या नवीन वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. ममता बॅनर्जी यांनी एक हाती सत्ता पश्चिम बंगालमध्ये आणली. त्यामुळे देशभरामध्ये भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून नवीन राष्ट्रीय आघाडी तयार करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कोणतीही नवीन आघाडी तयार करण्याची गरज नाही -

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशात काँग्रेसचे महत्त्व काय आहे, याचा साक्षात्कार संजय राऊत यांना झाला असून त्याचा आम्हाला आनंद आहे. केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे देशात ज्याप्रकारे कोरोना परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीतून देशाला सावरण्याचे काम केवळ काँग्रेस पक्षच करू शकतो. हे आता संजय राऊत यांच्यासह लोकांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देशात काँग्रेसशिवाय पर्याय उरलेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच कोणतीही राष्ट्रीय आघाडी किंवा तिसरी आघाडी तयार करण्याची गरज नसून, सध्या यूपीएच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्याचे काम काँग्रेस करत आहे. यूपीएमध्ये काँग्रेस सर्व पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे करते आहे. त्यामुळे कोणतीही नवीन आघाडी तयार करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

भाजप विरोधीपक्षांना एकत्र आणण्याचे काम केले पाहिजे -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील संजय राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. देशात भाजपाची सत्ता उलथून लावायची असेल तर, आतापासून सुरुवात करायला हवी. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर देशात एक वेगळे वातावरण आहे. या वातावरणाचा उपयोग करत भाजप विरोधीपक्षांना एकत्र आणण्याचे काम केले गेले पाहिजे. शरद पवार नुकतेच आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे आता विरोधीपक्षांची जुळवाजुळव त्यांच्याकडून सुरू होईल, अशा प्रकारचे संकेतही नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आले आहेत.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

नवीन आघाडी संदर्भात कोणतेही संकेत दिसत नाही -

राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या देशामध्ये कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारची राजकीय उलथापालथ सध्याच्या परिस्थितीमध्ये होणे कठीण आहे. केंद्र सरकारला राजकीय आव्हान देणारी नवीन आघाडी तयार करणे, अशा प्रकारची मानसिक स्थिती देशातल्या लोकांची नाही. याचा फटका विरोधीपक्षाला बसेल. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांच्याकडे उस्फूर्तपणे अशा प्रकारची प्रतिक्रिया आली असली तरी, अशा प्रकारचे आघाडी तयार झाली. तर, त्याचे नेतृत्व कोण करणार, असा पर्याय नेमका कसा उभारणार, असे अनेक प्रश्न या परिस्थितीत उभे राहतील. तसेच काँग्रेस राष्ट्रीय आघाडीचा आत्मा असेल, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत असले तरी, काँग्रेस समोरचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. काँग्रेस अजूनही पराभवाच्या छायेत आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवडणूक कोरोना संकटामुळे अजूनही होऊ शकली नाही. त्यामुळे नवीन आघाडी तयार करण्यासाठी एक मोठ्या प्रक्रियेतून विरोधीपक्षांना जावे लागेल. अनेक मुद्द्यांवर विरोधीपक्षांना तडजोडी कराव्या लागतील. तसेच निवडणुकीलाही अजून बराच काळ आहे. त्यामुळे सध्यातरी नवीन आघाडी संदर्भात कोणतेही संकेत देशांमध्ये दिसत नसल्याचे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फेर याचिका न्यायालयात दाखल करू - मंत्री विजय वडेट्टीवार

ABOUT THE AUTHOR

...view details