मुंबई -मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने रविवारी 18 जुलै रोजी पहाटे तीन ठिकाणी दरडी आणि घरे कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने रायगडच्या महाड येथील तळई गावात डोंगर कोसळून शुक्रवारी (23 जुलै) 42 जणांचा मृत्यू झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा दुर्घटना झाल्या आहेत. अशा घटना मुंबईमध्ये पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिका व राज्य सरकारने टेकड्यांवर राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तर धोक्याची ठिकाणे असलेल्या ठिकाणांची पुन्हा पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाते. कायम स्वरूपी स्थलांतर करण्यासाठी उपायोजना करता येईल अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील 257 ठिकाण धोकादायक म्हणून घोषित -
मुंबईत रविवारी 18 जुलैला पहाटे वाशी नाका चेंबूर, सूर्या नगर विक्रोळी, मुलुंड या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेत वाशी नाका चेंबूर येथे 19, सूर्या नगर विक्रोळी येथे 10 तर मुलुंड येथे 1 अशा एकूण 30 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळतील अशी 257 ठिकाण डोंगराळ भाग धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल २२ हजार झोपड्या असून त्यामध्ये राहणारे नागरिक पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन राहतात.
पुनर्वसनाबाबत धोरण बनवा - रवी राजा
मुंबईमधील टेकड्यांवर 5 लाख नागरिक राहतात. अर्धा किलोमीटर पर्यंत चालत जावे लागते अशा ठिकाणी नागरिकांनी घरे बांधली आहेत. 40 ते 50 वर्षाहून अधिक काळ त्याठिकाणी नागरिक राहत आहेत. अशा नागरिकांना नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपत नाही. हे दरवर्षी होत आहे, पालिका त्यांना फक्त नोटिस देते हे योग्य नाही. त्यांचे योग्य पुनर्वसन केले पाहिजे. मुंबईमधील दरडी कोसळण्याच्या जागा या राज्य सरकारच्या आणि कलेक्टरच्या अधिकारातील आहेत. टेकड्यांवर राहणाऱ्या आणि दरडी कोसळतील अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांनी धोरण बनवावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
कायमस्वरूपी धोका आहे तेथील नागरिकांचे पुनर्वसन करता येईल -
पुन्हा पाहणी करून टेकडीवर राहणारे आणि दरडी कोसळतील अशा ठिकाणांचे हजार्ड मॅपिंग करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणांच्या जागी पुन्हा पाहणी करण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. एखादे धोक्याचे ठिकाण राहून गेले असेल. नव्याने धोकादायक ठिकाण झाले असेल, धोकादायक ठिकाण असलेल्या ठिकाणी एखादे घर पाहणीतून राहून गेले असेल अशा सर्वाना नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणे करून तेथील नागरिक पावसाळयाच्या कालावधीत इतर ठिकाणी सुरक्षित जागी आपले वास्तव्य करतील. धोका टळल्यावर त्यांना पुन्हा त्याठिकाणी राहता येईल. तातपुरत्या स्वरूपात स्थलांतर करता यावे यासाठी शाळा, पुनर्वसन केंद्र, पीएपीच्या इमारती अशा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. टेकड्या आणि दरडी कोसळतात अशा ठिकाणच्या लोकांना हलवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी धोका आहे तेथील नागरिकांचे पुनर्वसन करता येईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.