मुंबई - रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना पोलीस कशा प्रकारे धडा शिकवतात हे आपण ऐकून असाल. मात्र, मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात एका महिला पोलिसाचा तिच्याच सहकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सहकारी पोलीस शिपायावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
समज देऊनही आरोपीचे त्रास देणे बंद नाही
ठाणे जिल्ह्यात राहणारी २६ वर्षीय पीडित महिला मुंबई सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. आरोपी पोलीसही याच महिलेसोबत कार्यरत आहे. ऑक्टोबर २०२० पासून एक पोलीस शिपाई या पीडितेच्या मागावर होता. सुरवातीला पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी शिपायाने पीडितेचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता तो महिलेच्या फोन नंबरवर वारंवार मेसेज करू लागला. वेळोवेळी या महिलेने आरोपी पोलीस शिपायाला समज देऊन हे प्रकार थांबवण्याबाबत समजावले. मात्र, आरोपीने त्रास देणे काही बंद केले नाही.