मुंबई- शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेष करून झोपडपट्टी विभागात हे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने पालिकेने आता झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागात बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थरनगर 184 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पालिकेने या भागात पोलिसांच्या मदतीने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने नागरिकांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागातील बेहराम पाडा, भारत नगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थर नगर परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी सहाय्यक आयुक्त एच पूर्व विभागाकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. सदर परिसर दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीने व्यापलेला असल्याने तेथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच जास्त आहे. या नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याबरोबरच सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यात पालिकेच्या एच पूर्व विभागातील महानगरपालिकेचे अधिकारी, खेरवाडी पोलीस स्टेशन व बीकेसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात वाढत असलेले भीतीचे वातावरण कमी करून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लावण्यासाठी ड्रोनचा वापर प्रभावी ठरला. या कारवाईदरम्यान भविष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाची जाणीव करून देण्यात आली. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आले. 25 एप्रिलपासून सुरू होत असणाऱ्या पवित्र रमजान उपवासादरम्यान नागरिकानी घरात राहूनच कोरोना संकटाशी मुकाबला करावा व पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.