मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत पोलिसांनी तब्बल 11 जणांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड चित्रपट क्षेत्रातील 5 नामवंत चित्रपट निर्मिती संस्था व निर्मात्यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.
'त्या' 5 निर्मात्यांची होणार चौकशी
हे जबाब सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या संदर्भात नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने नजीकच्या काळात काही नव्या चित्रपटांचा करार केला होता. मात्र, अचानकपणे वेळे आधीच यातील काही चित्रपटांचा करार मोडण्यात आला होता. अचानक सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत करण्यात आलेला करार का मोडण्यात आला, याचे कारण तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या महिन्यात सुशांत सिंग राजपूत याचे बॉलिवूडमधील काही निर्मात्यांसोबत काही कारणांवरून खटके उडाले होते. मात्र, या मागचे कारण अद्याप समोर न आल्याने त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.