मुंबई -पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यासंबंधी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या ( Mumbai Police Cyber Crime Branch ) पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस बजावली. त्यानुसार, फडणवीस हे रविवारी बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदविणार होते. मात्र, काही तासातच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी त्यांना इथे न येता ते स्वतः त्यांच्या सहकारी शासकीय निवासस्थान 'सागर' बंगला येथे येऊन जबाब नोंदवतील, असे सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण मुंबईतील शासकीय निवासस्थाना बाहेर गर्दी जमली आहे. या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलेल आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई सायबर सेलचे डीसीपी हेमराज राजपूत व एसीपी नितीन जाधव हे अधिकाऱ्यांसोबत दुपारी साडेबाराच्या दरम्यान देवेंद्र फडवणीस यांच्या शासकीय निवासस्थान दाखल झाले. अधिकाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश केला असून जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
फडणवीस यांनी 23 मार्च 2021 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधीची कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केली होती. संबंधित प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे आहे. याच प्रकरणामध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभुमीवर, फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी दंडसंहिता कलम 160 नुसार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय टेलिग्राफ ऍक्ट कलम 43 ब, 66 माहिती तंत्रज्ञान अधिनीयम 2008 सुधारीत सहकलम 05, गोपनीयतेचा भंग (ऑफीशियल सिक्रेट ऍक्ट) 1923 असा उल्लेख आहे.