मुंबई -अर्णब गोस्वामीच्या स्टुडिओचे काम अन्वय नाईक यांनी केले होते. या कामाची ८० लाख रुपये बिल झाले. गोस्वामीने ही रक्कम थकवल्यामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. यासंदर्भात त्यांनी चिठ्ठी देखील दिली होती. नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने याबाबत तक्रार दाखल केली तर त्यांना धमकीचे फोनही आले आहेत. पोलीस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करतील. दोषींवर कठोर कारवाई केली जातील, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सुशांतसिंहप्रमाणे अन्वय नाईक आत्महत्येचीही तातडीने चौकशी झाली पाहिजे. दोषींना ताबडतोब ताब्यात घ्या, अशी मागणी मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली. कंगना रानौतने मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावर देखील विचार होणार आहे, असे देशमुख म्हणाले.
अर्णब गोस्वामी व कंगना रनौतची पोलीस चौकशी करणार संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. कसाबसारखा अतिरेकी जिवंत पकडण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले होते. साळसकर, कामटे आणि करकरे या अधिकाऱ्यांनी मुंबईला वाचवण्यासाठी बलिदान दिले. कंगनाने मुंबईबद्दल वाईट बोलून या सर्वांचा अपमान केला आहे. सर्वपक्षीय सदस्यांनी याचा निषेध केला पाहिजे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदन केले.
केंद्र सरकारचे तळवे चाटणारा अर्णव गोस्वामीसारखा पत्रकार देशामध्ये अस्थिरता निर्माण करत आहे. तबलिगी जमातीची देखील त्यानेच बदनामी केली होती. मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करणारा पत्रकार हा पत्रकार असू शकत नाही, असे अबू आझमी यांनी विधानसभेत सांगितले.