मुंबई -कांदिवली समता नगर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी दुकानदारांची बैठक केली. या बैठकीत राज्य सरकारने अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कठोर निर्बंधांच्या नावाखाली सरकारने लॉकडाऊन जारी केल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. या निर्णयाविरोधात सर्वसामान्य दुकान चालक व व्यापारी संघटनांनी बंड पुकारले आहे. लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यासाठी दुकान व शोरूमसमोर मंगळवारपासून निषेधाचे फलक लावणार असल्याची घोषणा व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
कांदिवलीतील समतानगर पोलीस स्टेशनमध्ये दुकानदारांची बैठक
कांदिवली समता नगर पोलीस स्टेशनमध्ये दुकानदारांची बैठक केली. या बैठकीत राज्य सरकारने अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कठोर निर्बंधांच्या नावाखाली सरकारने लॉकडाऊन जारी केल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे.
किरकोळ दुकानदारांच्या फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले की, एकीकडे जीवनावश्यक वस्तू नसल्याने दुकाने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, ई-कॉमर्सच्या नावाखाली त्याच वस्तू ऑनलाईन पुरवठादारांना पोहचवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे दुकानदार देशोधडीला लागतील. म्हणून राज्यातील व्यापारी वर्ग दुकानांबाहेर निषेधाचे फलक लावणार आहे.
२०० कोटी रुपयांचा फटका
मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन म्हणाले की, या निर्णयामुळे सराफ बाजाराची दिवसाची 200 कोटी रुपयांची उलाढाल थांबणार आहे. याआधी झालेल्या लॉकडाऊनमुळे सराफ बाजाराचे तब्बल 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मोठ्या अडचणींचा सामना करून झवेरी बाजारातून गावाकडे गेलेल्या 3 लाखांहून अधिक कामगारांना मुंबईत परत आणता आले. आता पुन्हा लॉकडाऊन पुकारल्याने कामगार गावाकडे जाण्याची भीती आहे.
हे चालू राहणार
रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती, उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मालाची, वस्तूंची वाहतूक, शेती संबंधित सेवा, ई-कॉमर्स, मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा, अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व प्रकारचे माहिती तंत्रज्ञान उद्योग, सेवा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने परवानी दिलेली कार्यालये, वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण, हॉटेल, रेस्टॉरंट, फिरते खाद्य विक्रेते सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत पार्सल, घरपोच सेवा, परवानगी दिलेल्या निवडणुकांसाठी राजकीय मेळावे, सभा (मर्यादेनुसार), दहावी आणि बारावीच्या परीक्षा, जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा, कारखाने, उत्पादन आस्थापना, ऑक्सिजन उत्पादन, बांधकामविषयक कामे, पेट्रोल पंप हे सुरू राहणार आहे.